ठाणे राजकारणाला हिंसक वळण, उल्हासनगरात शिवसेनेचे दोन गट आमनेसामने
ठाणे जिल्ह्यातील राजकारणाला पुन्हा एकदा हिंसक वळण लागल्याचे चित्र दिसून आले आहे. उल्हासनगरमधील श्रीरामनगर परिसरात शिवसेनेच्या ठाकरे गट पदाधिकारी काशिनाथ तरे आणि शिंदे गटातील जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे आमनेसामने आले. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, श्रीरामनगर येथील शिवसेना शाखेच्या ताब्यावरून वर्चस्वाचा वाद उफाळून आला. या वादातून दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वादावादी झाली. काही वेळातच हा वाद हाताबाहेर जाऊन धक्काबुक्कीपर्यंत पोहोचला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी राजकीय तणाव कायम असल्याचे दिसून येत आहे.
या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात असून राजकीय मतभेद हिंसाचाराच्या मार्गाने न नेता शांततेने सोडवावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
What's Your Reaction?