उल्हासनगर महापालिकेच्या महापौरपदावरून राजकीय वातावरण तापले
मराठी व शीख नागरिक हाच महापौर व्हावा – राष्ट्रवादी अजित पवार गटाची भूमिका
उल्हासनगर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापौरपदावरून राजकीय वातावरण तापले आहे. शहराच्या विकासासाठी योगदान देणारा मराठी किंवा शीख समाजातील नागरिक महापौर व्हावा, अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेते भारत गोगींनी मांडली आहे.
स्थानिक न्यूज चॅनेलशी बोलताना भारत गोगींनी सांगितले की,
“उल्हासनगरच्या विकासात मराठी आणि शीख समाजाचा मोठा वाटा आहे. त्यामुळे महापौरपदावर याच समाजातील सक्षम व्यक्तीला संधी दिली पाहिजे.”
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाकडून स्थानिक पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून इच्छुक उमेदवारांकडून जोरदार तयारी सुरू असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, भारत गोगी यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. काही राजकीय पक्षांनी या भूमिकेवर टीका केली असली, तरी उल्हासनगरच्या विकासासाठी स्थानिक समाजाला नेतृत्वाची संधी मिळावी, असा त्यांचा ठाम आग्रह आहे.
शहराच्या विकासासाठी सर्व समाजांना सोबत घेऊन पुढे जाणे आवश्यक असून, महापौरपद कोणालाही देताना शहरहित डोळ्यासमोर ठेवावे, असेही भारत गोगींनी स्पष्ट केले.
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर या वक्तव्यामुळे उल्हासनगरच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.
What's Your Reaction?